केजरीवाल यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश; राऊस एव्हेन्यू न्यायालयाने कोठडी 19 जूनपर्यंत वाढवली

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 19 जूनपर्यंत वाढवली. तसेच वैद्यकीय कारणास्तव केजरीवाल यांनी जामिनाची मुदत आणखी 7 दिवसांनी वाढवण्यासाठी केलेली विनंती याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, केजरीवाल यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देश ईडीच्या अधिकाऱयांना दिले. केजरीवाल यांच्या याचिकेवर व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.

केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर 1 जून रोजी विशेष न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. याचिकेवरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी केजरीवाल यांनी जामिनात 7 दिवसांची मुदतवाढ करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेला ईडीने विरोध केला होता.

केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. सर्वेच्च न्यायालयाने 10 मे रोजी त्यांना 21 दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. 2 जून रोजी सायंकाळी 5 वाजता केजरीवाल तिहार जेलमध्ये हजर राहिले.

केजरीवाल यांना 1994 पासून मधुमेहाचा आजार असून त्यांच्या शरीरात किटोनचा स्तर वाढला आहे. त्यामुळे मूत्रपिंड सामान्यपणे काम करत नाही. अशा स्थितीत त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती केजरीवाल यांचे वकील एन.हरीहरन यांनी व्यक्त केली.