बडोदा एक्स्प्रेस वे एप्रिलपर्यंत होणार खुला; वाहतूककोंडी फुटणार, हजारो वाहनचालकांना दिलासा

मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जाणाऱ्या बडोदा एक्स्प्रेस वेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा एक्स्प्रेस वे एप्रिलपर्यंत खुला होणार असल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूककोंडी फुटणार आहे. त्यामुळे मुंबई ते गुजरात प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वेगवान होणार असून हजारो वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

बडोदा – मुंबई एक्स्प्रेस वे एकूण ३७९ किलोमीटर लांबीचा आठ पदरी महामार्ग आहे. हा हायवे वसई, पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यातील सुमारे ५१ गावांमधून जाणार आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील तलासरी ते गंजाड पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. गंजाड – मासवण – शिरसाठ असे या दुसऱ्या टप्प्यातील काम फेब्रुवारी-मार्च दरम्यान पूर्ण होणार आहे. तर शिरसाठ ते अकलोली-वकडोस्वारी मार्गे आमने-भोज-मोरबे या टप्प्यातील काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

तलासरी ते मोरबेचा रस्ता १५६ किलोमीटर लांबीचा असणार असून पुढे हा महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-बडोदा – दिल्ली हा ५५० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ६ तासात पार करता येणार आहे. या महामार्गावर एकूण २४ टोल प्लाझा, २४ लेन आणि १ हजार ४७६ अंडरपास असणार आहेत. या महामार्गावरील महत्वाची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण करून २६ एप्रिल पासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती महामार्ग प्रबंधक सुहास चिटणीस यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, पुणे, ठाणे येथे जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहतूककोंडी, खराब रस्त्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे. बडोदा-मुंबई एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर हा धोकादायक प्रवास थांबेल.
संजय पाटील, तालुकाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डहाणू.