हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्य पदक मिळणार की नाही या जागतिक क्रीडा लवादाच्या निकालाकडे (सीएएस) तमाम देशवासीयांचे लक्ष लागले होते, मात्र विनेशच्या या निकालाबाबत क्रीडा लवादाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. तिसऱयांदा याबाबतची तारीख बदलली असून, आता हा निकाल शुक्रवारी होणार आहे.
विनेश फोगाटने 50 किलो फ्री स्टाईल पुस्तीची फायनल गाठली होती, मात्र फायनलपूर्वी झालेल्या वजनामध्ये विनेशचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम अधिक भरल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविण्यात आले होते. विनेशने या निर्णयाला जागतिक क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. आधी हा निकाल 10 ऑगस्टला येणार होता, मात्र त्यानंतर जागतिक क्रीडा लवादाने पुन्हा एकदा सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर 13 ऑगस्टला याबाबत निर्णय देऊ असे सांगितले होते, मात्र आता विनेश फोगाटच्या या याचिकेवर शुक्रवारी (दि. 16) रात्री साडेनऊपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.
विनेश व निशा कमनशिबी
विनेश फोगाटला 50 किलो गटात हिंदुस्थानची पहिली ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी महिला पुस्तीपटू होण्याची संधी होती. मात्र सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी घेण्यात आलेल्या वजनात तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम अधिक भरले अन् तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविण्यात आले. दुसरीकडे निशा दहियाने 68 किलो गटात दमदार कामगिरी केली, मात्र उपांत्यपूर्व लढतीत 5 मिनिटांपर्यंत 8-0 अशी आघाडीवर असताना तिच्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. तिच्या दुखापतीचा फायदा घेत उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने 8-8 अशी बरोबरी साधली अन् अखेरच्या 12 सेपंदांत 10-8 फरकाने बाजी मारत निशाच्या ऑलिम्पिक पदकाचा चक्काचूर केला.
बॉक्सिंगमध्ये दोन पदके हुकली
हिंदुस्थानची स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिला 75 किलो गटातील महिलांच्या उपांत्यपूर्व लढतीत चीनच्या ली कियानने 4-1 असे हरविले. याचबरोबर निशांत देवही 71 किलो गटातील पुरुषांच्या उपांत्यपूर्व लढतीत मेक्सिकोच्या माकाx वेर्दे याच्याकडून 4-1 फरकाने पराभूत झाला. हिंदुस्थानचे हे दोन्ही बॉक्सर उपांत्य फेरीत गेले असले तरी आपली दोन पदके पक्की झाली असती. कारण बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूंनाही कांस्यपदक दिले जाते.