
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल या आठ महापालिकांच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक 3 ते 10 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. ही निवड गुप्त मतदानाऐवजी हात वर करून होणार आहे. त्यामुळे सभागृहात बहुमत कुणाकडे आहे याची मोजणी करून महापौर, उपमहापौर निवडीची घोषणा केली जाणार आहे. अवघ्या 15 मिनिटांत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. बाजूने आणि विरोधात मतदान करणाऱ्यांची स्वाक्षरीसह नोंद विशेष सभेच्या कार्यवृत्तात केली जाणार आहे. कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून निवडीची प्रक्रिया पार पाडणार आहेत.
ठाण्यात महापौर कोण?
ठाण्याच्या महापौर, उपमहापौरपदाची निवड 3 फेब्रुवारीला होणार आहे. 30 जानेवारीला कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे महापालिकेच्या सचिव विभागात जमा करण्यात येणार आहेत. या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. शिंदे गटातून महापौरपदासाठी सात जणांची नावे पुढे आली असून यातून कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबईसाठी रणजीत यादव पीठासीन अधिकारी
महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांची नियुक्ती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. या निवडणुकीत नगर सचिव म्हणून महापालिकेच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे या काम पाहणार आहेत. दोन्ही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत येत्या 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 आहे.
भाईंदरचा महापौर मराठी होण्यासाठी 3 फेब्रुवारीला मोर्चा
मीरा-भाईंदरमध्ये मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी 2 फेब्रुवारीला सुभाषचंद्र बोस मैदान येथे आंदोलन करण्यात येणार असून 3 फेब्रुवारीला सुभाषचंद्र बोस ते महापालिका असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे आणि मराठी एकीकरण समितीसह सामाजिक संस्था, मंडळे व विविध संघटनांचे प्रतिनिधी हे आंदोलन करणार आहेत. मीरा-भाईंदरचा महापौर मराठी व स्थानिक असावा ही सामान्य मराठी नागरिकांची भावना असल्याचे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.
पनवेलची विशेष सभा 10 फेब्रुवारी रोजी
पनवेल महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा बिगुल अखेर वाजला आहे. 10 फेब्रुवारी रोजी महापौर निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केडीएमसीसाठी आज, उद्या फॉर्म भरण्याची मुदत
केडीएमसी महापौरपदासाठी इच्छुक असलेले नगरसेवक 29 व 30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 या वेळेत उमेदवारी अर्ज सचिव कार्यालयात दाखल करू शकतात. सर्व अर्जाची छाननी करून हे अर्ज 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या महापौर, उपमहापौर निवडीसाठीच्या विशेष महासभेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती सचिव किशोर शेळके यांनी दिली. पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती झाली आहे.
वसई-विरार महापौरपदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल
वसई-विरार महानगरपालिका महापौर व उपमहापौर निवडण्यासाठी विशेष सभा 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालय विरार येथे या निवडी होतील. महापौर व उपमहापौर पदासाठी 30 जानेवारी ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. निवडीच्या सभेत एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. 15 मिनिटांचा अवधी संपल्यानंतर लगेचच बिनविरोध निवड किंवा मतदान होणार आहे.
उल्हासनगरची निवडणूक रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली
उल्हासनगरातील महापौर, उपमहापौरांची निवडणूक 3 फेब्रुवारीला होणार आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या देखरेखीखाली आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या उपस्थितीत ही निवड होणार आहे. त्यासाठी महापालिका सभागृहात विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले असून त्यात निवडून आलेल्या 78 नगरसेवकांच्या साक्षीने महापौर, उपमहापौरांच्या नावांचा उलगडा होणार आहे. उल्हासनगरचे महापौरपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे.
भिवंडीत महापौर निवड अधांतरी
महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत भिवंडी महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण आहे. मात्र अद्याप महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. पालि का आयुक्तही रजेवर आहेत. त्यामुळे सचिव कार्यालयातून काहीही अधिकृत माहिती मिळत नाही. त्यामुळे महापौर निवड अधांतरी आहे.






























































