घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। राहुरी

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावात मंगळवारी घरफोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला गावक-यांनी पाठलाग करून पकडले. यावेळी इतर दोघा चोरांनी गावक-यांवर दगडफेक करून आपल्या साथीदाराला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यर्थ ठरला.

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरीची ही घटना घडली. टाकळीमिया येथील अकबर सुभेदार शेख यांच्या स्टोअर रूमचे कडी कोयंडा तोडून तिघा चोरांनी आत प्रवेश केला. दरम्यान सामानाच्या आवाजाने जागे झालेल्या शेख यांनी आरडाओरडा केल्याने तिघे चोर पळाले. पण तारेच्या कंपाऊंड वरून दोघे चोर उड्या मारून पळाले. माञ रामेश्वर जंगल्या भोसले (२८) हा चोर तारेच्या कुंपणातच अडकल्याने पाठलाग करणा-या गावक-यांच्या तावडीत सापडला.

आपला जोडीदार पकडला गेल्याने इतर दोघांनी मागे वळून गावक-यांवर दगडफेक केली. पण गावक-यांनी भामट्याला पकडुन ठेवल्याने दोघे चोर घटनास्थळा वरून फरार झाले. या घटनेची खबर मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रामेश्वर भोसले यास ताब्यात घेतले.
.
राहुरी तालुक्यात चो-या घरफोड्याच्या घटनांचे सत्र सुरू असुन गेल्या सहा महिन्यात झालेल्या चो-या,घरफोड्या,रस्तालुट या घटनांमध्ये बाहेरील जिल्ह्यातील चोरांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.