मालाड येथील निर्मात्याच्या घरी चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट निर्मात्याच्या नोकराला डांबून 25 लाख रुपये घेऊन पळाल्याप्रकरणी तिघांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. देवश प्रेमचंद सव्हसिया ऊर्फ दीपू, शेख मुस्तकीम ऊर्फ सोहेल आणि सर्वेश शर्मा अशी त्यांची नावे आहेत. सर्वेश हा कंत्राटदार असून त्याने निर्मात्याच्या घरी फर्निचरचे काम केले होते. झटपट पैशासाठी त्याने दीपू आणि सोहेल या दोन कामगारांना हाताशी धरून हा कट रचला.

मालाड येथे चित्रपट निर्माते राहतात. रविवारी ते मीरारोड येथे गेले. तेव्हा त्यांच्या घरी नोकर एकटाच होता. दुपारच्या वेळेस दीपू आणि सोहेल हे मास्क लावून आत घरात शिरले. त्यांनी नोकराला दोरीने  बांधले. त्यानंतर  कपाटातील 25 लाख रुपये आणि सोने घेऊन पळ काढला. अर्ध्या तासाने नोकराने स्वतःची सुटका करून लुटीच्या घटनेची माहिती निर्मात्याला दिली. निर्मात्याच्या तक्रारीवरून बांगुर नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक भास्कर कदम, दत्तात्रय गुंड, सहाय्यक निरीक्षक संजय सरोळकर आदी पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. पैसे लुटण्यापूर्वी सोहेल आणि दीपू हे दोघे एका मेडिकलमध्ये मास्क घेण्यासाठी गेले. पैसे लुटल्यानंतर ते पुन्हा गोरेगाव येथे आले. तेथे आल्यावर दीपूने कपडे बदलले व ते रिक्षाने जोगेश्वरी येथे गेले. जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये ते दोन दिवस राहिले. पोलिसांनी जोगेश्वरी येथून त्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत सर्वेशचे नाव समोर आले.