
जालना जिल्ह्यातील बदनापुर येथील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सोन्याचांदीचे दुकान फोडून सुमारे 4 लाखांचा ऐवज चोरण्याची घटना घडली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील दुकान फोडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रविवारी रात्री शहरातील फुलेनगर, भारतीय स्टेट बँकेची शाखा तसेच बसस्थानक परिसरातही चोरटयांनी दरोड्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने चोरटयांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही.
बदनापूर शहरात रवीवार रात्री चोरटयांनी धुमाकूळ घातला असून बदनापूरचे मध्यवर्ती ठिकाण व सोन्या-चांदीची बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानात चोरीची घटना घडली आहे. एक सोन्या –चांदीचे एका दुकानाचे शटर तोडून सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेला. जालना येथील प्रशांत रूणवाल हे नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान रोजचा व्यवहार आटोपून त्यांचे येथील सद्गुरू ज्वेलर्स दुकान बंद करून घरी गेले. रात्री चोरटयांनी शटर तोडून दुकानात प्रवेश केला. या दुकानातील जवळपास 4 लाखांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला. रविवारी रात्री 1 वाजेनंतर शहरातील विविध भागात चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला. फुलेनगर भागातील काही घराजवळ चार ते पाच जणांचे टोळके फिरत असल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना कळवले. तसेच नागरिकांनी एकत्रित होत रात्र जागून काढली. तसेच भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील सायरनही रात्री 3 वाजेच्या दरम्यान अचानक वाजल्यामुळे बँकेचे शटर तोडण्याचा चोरटयांनी प्रयत्न केला असावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोन्या-चांदीच्या दुकानांसह मोठया प्रमाणात कापड दुकाने व इतर दुकाने असून शहरातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. असे असताना या भागात चोरटे जवळपास दीड तास प्रत्येक दुकानांचे शटर तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. सद्गुरू ज्वेलर्स या दुकानासमोर कॅमेरा असताना या चोरटयांनी समोरील कॅमेरा तोडून एक शटर त्यानंतर आतील जाळीचे चॅनेल गेट कापून दुकानात प्रवेश केला. या दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरटयांना सापडला नसल्यामुळे तो सुरक्षित आहे. त्याच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्यात असल्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सकाळी पोलीस निरीक्षक खेडकर यांनी पंचनामा केला असून जालना येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. हे श्वान पथक चोरटयांचा माग काढू शकले नाही.



























































