
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील विनायक लक्ष्मण देशमुख यांच्या घराच्या बाथरुमची खिडकी तोडुन अज्ञात चोरट्याने सोळा तोळे सोने लुटून नेण्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. या संदर्भात देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आला आहे.
देशमुख यांच्या दोन्हीं सुना व पत्नीने त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने देशमुख यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. हे दागिने त्यांनी एका पिशवीत ठेऊन ही पिशवी घरात असलेल्या संडास बाथरुच्या दरवाजाच्या भिंतीला लटकून ठेवली होती. बुधवारी पहाटे देशमुख यांचा मुलगा प्रकाश लघुशंकेसाठी उठला असता त्याला ज्या पिशवीत दागिने ठेवले होते ती पिशवी उचकली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने घरातील सर्वांना उठवले असता पिशवीतील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी घराची पाहणी केली असता बाथरूमची खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून दागिने लंपास केल्याचे लक्षात आले. या पिशवीमध्ये सोन्याच्या बांगड्या, नेकलेस, लॉकेट, अंगठ्या, मिनी गंठण, मोहनमाळ असे मिळून सुमारे सोळा तोळे सोने होते.


























































