
पुणे शहरातील विविध भागातील मंदिरातही चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मंडईतील श्री शारदा गणपती मंदिरातील दागिन्यांच्या चोरीनंतर आता चोरट्यांनी बिबवेवाडीतील गंगाधाम चौकातील माँ आशापुरा माता मंदिरातील दानपेटीतून 25 ते 30 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना 19 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत घडली.
याप्रकरणी दिलीप मुनोत ( वय 65, रा. कोंढवा-खुर्द ) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बिबवेवाडीतील गंगाधाम चौकाजवळ माँ आशापुरा माता मंदिर आहे. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी मंदिरातील सभा मंडपासह गाभाऱ्याच्या बाहेरील दोन्ही दानपेट्या फोडून 25 ते 30 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करीत आहेत.

























































