माढा तालुक्यात घरफोडी; 2 लाख 70 हजाराचा ऐवज लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माढा तालुक्यातील अरण येथील संत सावता माळी पेट्रोल पंपापाठीमागील शेतातील घराच्या दरवाजाची कडी अज्ञात चोरट्यांनी उचकटून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 70 हजाराचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी रात्री घडली.

माढा तालुक्यातील अरण येथील लक्ष्मण मारुती दांडगे ( वय67) आपल्या कुटुंबासोबत जेवण करुन शुक्रवारी घराचा दरवाजा आतून लावून रात्री 10 वाजता झोपले होते. शनिवार पहाटे चार वाजता मुलगा नवनाथ दांडगे व लक्ष्मण दांडगे उठल्यानंतर त्यांना घरातील कपाट व टेबलचे ड्रावर उघडलेले दिसले. त्यातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटात ठेवलेले 1 लाख 20 हजार रुपये चोरण्यात आले होते. तसेच खिशातील चावीने टेबल ड्रावर उघडून पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने (दोन तोळे वजनाचा सोन्याचा गंठण एक तोळे वजनाच्या तीन अंगठ्या) असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. याबाबत लक्ष्मण दांडगे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.