रेणापूरमध्ये मोटारसायकलच्या डिक्कीतून रक्कम पळवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिक विम्याची रक्कम बँकेतून काढून मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवली होती. अज्ञात चोरट्याने मोटारसायकलच्या डिक्कीमधून रक्कम पळवल्याची घटना रेणापूर येथील पिंपळफाटा येथे घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात मुक्ताराम सुखदेव घुगे (रा. वंजारवाडी ता. रेणापूर) यांनी तक्रार दाखल केली. एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी वंजारवाडी येथून मोटारसायकलवर तक्रारदार रेणापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आले. बँकेतून पिक विम्याची रक्कम 15,500 रुपये आणि स्वतःजवळील 8 हजार रुपये त्यांनी मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. चहा पिण्यासाठी पिंपळफाटा येथे हॉटेलमध्ये गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने मोटारसायकलच्या डिक्कीमधील 23,500 रुपये काढून नेले. चहा पिऊन परत आल्यानंतर मोटारसायकलची डिक्की उघडी दिसली व आतील पैसे चोरण्यात आल्याचे दिसून आले. रेणापूर पोलीसांनी चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.