श्रीगोंदामध्ये पिकअपमधील अजीच लाखांची रोकड लांबवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांना दुधाचे पैसे देण्यासाठी बँकेतून काढलेली 2 लाख 69 हजार रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी चोरट्यांनी भरदिवसा लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजता श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात घडली आहे. भरदिवसा चोरट्यानी रोकड लांबवल्यामुळे खळबळ उडाली आहे. रोकड घेऊन पळून जाणारा 20 ते 25 वर्षांचा एक तरुण सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या चोरीच्या घटनेबाबत नवनाथ बाळासाहेब जामदार (रा. शिपलकरवाडी) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामदार हे शेतकऱ्यांचे दूध गोळा करून स्वतःच्या पिकअप जीपमधून काष्टी येथे डेअरीवर नेतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी जामदार यांनी सकाळी दूध गोळा करून ते काष्टी येथील कृष्णाई दुधडेअरीवर नेले. त्यानंतर त्यांनी काष्टी येथील युनियन बँकेत जाऊन त्यांच्या खात्यावरील 1 लाख 90 हजार रुपये रोख रक्कम काढली. जामदार यांच्याकडे आधीच 80 हजारांची रोकड होती. ती आणि बँकेतून काढलेली रोकड अशी एकूण 2 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम त्यांनी एका पिशवीत ठेवली. ती पिशवी त्यांनी त्यांच्या पिकअपमधील चालकाच्या सीटच्या मागच्या बाजूस ठेवली. त्यानंतर ते काष्टी येथील जयभवानी चौकातील गोपाळ डेअरीजवळ आले. त्याठिकाणी पिकअप उभी करून रोकडमधील एक हजार रुपये घेऊन ते फळे घेण्यासाठी गेले. फळे घेऊन परत आल्यावर त्यांना त्यांच्या जीपचा दरवाजा उघडा दिसला तसेच सीटच्या मागे रोकड ठेवलेली पिशवी गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपली रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यामुळे जामदार यांनी जवळच असलेल्या एका कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 20 ते 25 वर्षे वयोगटातील एक तरुण हा पिकअपमधील रोकड ठेवलेली पिशवी घेऊन जाताना दिसला. त्यामुळे चोरीची खात्री होताच त्यांनी तडक श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.घटनास्थळी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. युनियन बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित तरुण बँकेतच जामदार यांच्यावर पाळत ठेवून असल्याचे दिसले. पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत