
तळजाई टेकडीच्या पायथ्याला मैत्रीणीसोबत थांबलेल्या एका तरुणाला चोरट्यांनी कोयत्याच्या धाकाने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. याप्रकरणी आकाश चंद्रकांत वर्मा (वय 20, रा. सहवास कॉर्नर, कर्वेनगर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शनिवारी दुपारी मैत्रीणीसोबत तळजाई टेकडीच्या पायथ्याला गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आलेल्या एका चोरट्याने आकाशसह तरुणीला धमकविण्यास सुरूवात केली. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून दोघांकडील मोबाईल, दुचाकी, एटीएम कार्ड असा 60 हजार रूपयांचा ऐवज चोरुन नेला. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज मिळते का याचा शोध घेतला जात आहे. महिन्याभरापूर्वी तळजाई टेकडीवर भरदुपारी तरुण व त्याच्या मैत्रिणीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे टेकडी परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

























































