बोरिवली पूर्व येथील एका खासगी शाळेत चोरटय़ाने हातसफाई केल्याची घटना घडली आहे. चोरटय़ाने 80 हजार रुपये आणि बँकांचे एफडी पेपर, हार्ड डिस्क चोरून पळ काढला आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
बोरिवली पूर्व परिसरात एक खासगी शाळा आहे. त्या शाळेत तक्रारदार हे मुख्याध्यापक म्हणून काम करतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शाळेतील कर्मचाऱ्याने त्यांना पह्न केला. शाळेच्या आतील मुख्य ऑफिसच्या दरवाजाची कडी-कोयंडा तुटलेला होता. याची माहिती त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. मुख्य प्रशासन कार्यालयाच्या दरवाजाचे लॉक तुटलेले होते.
अधीक्षक आणि मुख्याध्यापक कार्यालयाच्या दरवाजाचा लॉकदेखील तुटलेला होता. अधीक्षक कार्यालयातील कपाटाचा दरवाजा जबरदस्तीने तोडला होता. चोरटय़ाने तेथून 80 हजार रुपये आणि बँक एफडीचे 22 पेपर चोरीला गेले होते. तसेच क्लर्क कार्यालयातील हार्ड डिस्कदेखील जागेवर नव्हते. घडल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्या चोरटय़ाचा शोध घेत आहेत.