थर्मामीटरवर धावते मध्य रेल्वेची अनोखी ‘ढकल’गाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,  मुंबई

मध्य रेल्वेने अतिवृष्टीत पावसाच्या पुराचे पाणी जाऊन बिघडलेल्या ट्रेनना सुरक्षितपणे बाहेर खेचण्यासाठी खास ‘वॉटरप्रूफ’ डिझेल इंजिन तयार केले. या इंजिनात ट्रक्शन मोटर गरम होऊन ती बंद पडू नये यासाठी तापमान मोजण्याचे खास थर्मामीटर बसविण्यात आले आहेत.

या इंजिनाने पश्चिम रेल्वेवर ९ व १० जुलै रोजी कोसळलेल्या पावसाने वसई-विरारच्या पट्ट्यात रुळांवर साचलेल्या ४०० ते ६०० मि.मी. पाण्यातून राजकोट एक्स्प्रेसला यशस्वीपणे खेचून भिवंडीला नेले. या डिझेल इंजिनात पाणी शिरू नये म्हणून ती वॉटरप्रूफ करण्यासाठी मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील डिझेल लोको शेडमधील डिएमई मोहित मांडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी कोणताही अतिरिक्त खर्च न करता कारखान्यात उपलब्ध साहित्य वापरून अनोखी शक्कल लढविली आहे.

डिझेल इंजिनाच्या खालच्या भागात ट्रक्शन मोटर थंड राहण्यासाठी गरम हवा बाहेर पडण्यासाठी वायूविजन होण्यासाठी जागा असते. मात्र नेमके त्याच जागेतून ट्रकवर साचलेले पाणी मोटरच्या आत शिरून इंजिन बंद पडण्याचा धोका असतो. ही जागा बुजवून वॉटरपफ करण्यात आली आहे. त्यामुळे इंजिन अगदी १२ इंच पाण्यातदेखील धावू शकणार आहे. परंतु इंजिनांच्या ट्रक्शन मोटरची गरम हवा बाहेर पडण्याचा हा मार्ग बंद झाल्याने इंजिन अतिरिक्त गरम होऊन बंद पडण्याचा धोका होता. त्यासाठी या इंजिनात असलेल्या सहा ट्रक्शन मोटरचे तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी खास थर्मामीटर येथे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इंजिनाच्या मोटर कार्यक्षम ठेवण्यास मदत मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

आणखी एक वॉटरप्रूफ इंजिन

शंटिंगसाठी म्हणजेच लांबपल्ल्याच्या गाड्यांचे डबे यार्डात खेचून आणण्यासाठी डब्ल्यूडीएस डिझेल इंजिनाचा सर्रास वापर केला जात असतो. हे इंजिन कमी क्षमतेचे असल्याने त्यास रेल्वेच्या परिभाषेत गमतीने ‘पप्पू’ असे म्हटले जाते. हे इंजिन खरे तर चार इंच पाण्यात चालते, परंतु त्यात तांत्रिक बदल करण्यात आल्यानंतर ते १२ इंच पाण्यातही धावू शकेल असे म्हटले जात आहे. मात्र पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा येथे ८ इंच पाण्यात त्याची यशस्वी चाचणी झाली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. असे आणखी एक वॉटरप्रूफ इंजिन तयार करण्यात आले असून ते लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डात सज्ज ठेवण्यात आले आहे.