
सामना प्रतिनिधी । मुंबई
लोकलमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरण्याबरोबरच घरफोडय़ा करणाऱया दोघा रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट-7 च्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून चोरीचे नऊ लॅपटॉप आणि 16 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर लोकलमध्ये हातसफाई करण्याबरोबरच बंद घरात चोऱया करणारे व अमली पदार्थाच्या गुह्यात सहभागी असलेले दोन सराईत चोर ऍण्टॉप हिल येथील सेक्टर 1 येथे येणार असल्याची खबर युनिट 7 चे उपनिरीक्षक संजय सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सलीम अल्लाउद्दीन शेख (50) आणि रमेश शेटये (36) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी लोकलमध्ये चोऱया केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या विरोधात रेल्वे पोलीस ठाणे व मुंबईतील पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
























































