मतदार नोंदणी कार्यालयात चोरी करणारे अटकेत

कलिना विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयात चोरी करणाऱया दोघांच्या वाकोला पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तुषार मोरे आणि रोहित कागदा अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

तक्रारदार हे कलिना विधानसभा मतदारसंघात नोंदणी अधिकारी म्हणून काम करतात. तळमजल्यावर कार्यालय, तर पहिल्या मजल्यावर हॉल आहे. त्याच्या बाजूला सरकारकडून आधारकार्ड चालवण्यासाठी जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी कामाच्या सुविधेसाठी रॅकचे पत्रे आणले होते. ते पत्रे एका बाजूला ठेवण्यात आले होते. जून महिन्यात कार्यालयात सुट्टी असल्याने चोरटय़ाने कार्यालयाच्या हॉलच्या खिडकीमधून आत प्रवेश केला. चोरटय़ाने पत्रे, पाच सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, नळ असा मुद्देमाल चोरून पळ काढला.

चोरटय़ाने नळ चोरल्याने कार्यालयात पाणी साचले होते. हा प्रकार तक्रारदार याच्या लक्षात आला. त्याने याची माहिती वाकोला पोलिसांना दिली. वाकोला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून पोलिसांनी तुषार आणि रोहितला ताब्यात घेऊन अटक केली. अटक करून त्या दोघांना न्यायालयात हजर केले होते.