पाथर्डीत चोरट्यांचा धुमाकूळ, तीन जणांवर धारदार शस्राने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी पालिका हद्दीत असलेल्या बोरुडे वस्तीवर गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी जबरी चोरी करत तीन जणांना धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, बोरुडे वस्तीवर गुरुवारी रात्री चोरटे आले व त्यांनी वस्तीवरील संदीप नामदेव बोरुडे, देविदास नामदेव बोरुडे या दोन सख्या भावांसह त्यांची आई पार्वती नामदेव बोरुडे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत जखमी केले. तर या वेळी चोरटयांनी बोरुडे यांच्या घरातील ऐवज चोरून नेला. या वेळी बोरुडे यांनी आरडाओरडा केल्याने जवळच राहणारे लक्ष्मण बोरुडे, अक्षय बोरुडे, महेश वायकर, उमेश साखरे, रमेश साखरे हे बोरुडे वस्तीवर आले व त्यांनी सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले तर त्या नंतर पुढील उपचारासाठी सर्वाना नगर ला हलवण्यात आले आहे. या संदर्भात शुक्रवारी सायंकाळ पर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली नव्हती. दरम्यान या घटनेतील चोरट्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोरुडे यांनी दिली आहे.