अकरावी ऑनलाइन प्रवेश; नव्याने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱया यादीत संधी

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱया गुणवत्ता यादीची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत कोणत्याही यादीत, कोटय़ांतर्गत प्रवेश न मिळालेल्या तसेच नव्याने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच तिसऱया गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी 22 जुलैला सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. उद्या, 14 जुलैपासून या यादीसाठी तसेच कोटय़ांतर्गत प्रवेशाची अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

14 ते 17 जुलैदरम्यान विद्यार्थी नियमित फेरी 3 साठी कॉलेज पसंतीक्रम भरू शकतात. अर्ज लॉक असलेले विद्यार्थीच प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यासोबत विद्यार्थी कोटा प्रवेशासाठी ऑनलाइन पसंती नोंदवू शकतात. 22 जुलैला गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठी 24 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत आहे. या नियमित यादीनंतर अकरावीच्या विशेष फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तिसऱया यादीत मिळालेला प्रवेश घ्यायचे नसेल तर तो विद्यार्थी विशेष फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे.

n पहिल्या यादीत प्रवेश घेतलेल्या, दुसऱया यादीत प्रथम पसंतीचे कॉलेज नाकारणाऱया तसेच घेतलेला प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱया यादीत प्रवेशाची संधी मिळणार नाही.

n 19 जुलैला कोटय़ांतर्गत प्रवेशासाठी पात्र, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी कॉलेज स्तरावर जाहीर होणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 22 ते 24 जुलैपर्यंत मुदत आहे.