
नव्या जगातील संवादाचे व माहितीचे प्रमुख माध्यम ‘एक्स’ आणि चॅट जीपीटीसह हजारो वेबसाईट्स आज अचानक हँग झाल्या. त्यामुळे अब्जावधी नेटकऱ्यांचा प्राणवायूच खंडित झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. एकच घालमेल सुरू झाली. साडेतीन तासांनंतर सेवा पूर्ववत झाली.
असंख्य वेबसाईट्सना वेब व अन्य सेवा पुरवणाऱ्या ‘क्लाऊडफ्लेअर’ कंपनीकडून सेवा खंडित झाल्याने हा झटका बसला. हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सगळंच हँग झालं.
या वेबसाईट्सना फटका
एक्स, फेसबुक, चॅट जीपीटी, स्पोटीफाय, शॉपीफाय, जेमिनी, कॅनव्हा, स्नॅपचॅट, रेडिट, पर्प्लेक्सिटी, टी मोबाईल, ग्रामीण, क्लॉड, वर्जन, डिस्कॉर्ड, डाऊनडिटेक्टर, उबर, बेट 365, लेटरबॉक्सड, रोब्लॉक्स, पर्ह्टनाइट, डोनाल्ड ट्रम्प यांचे टथ सोशल, लाखो न्यूज वेबसाईट्स.
काय करते क्लाऊडफ्लेअर?
क्लाऊडफ्लेअर ही एक आयटी सेवा पुरवठादार कंपनी आहे. आधुनिक जगातील इंटरनेट सेवा सुरळीत चालण्यासाठी क्लाऊडफ्लेअर कार्यरत असते. याशिवाय इंटरनेटवर ट्रफिक प्रमाणाबाहेर वाढल्यास किंवा सायबर हल्ला झाल्यास ही कंपनी विविध वेबसाईट्सच्या कंटेंट डिलिव्हरीची आणि सायबर सुरक्षेची काळजी घेते. ही प्रणाली अयशस्वी झाल्यास तिचा परिणाम एकापेक्षा अनेक सेवांवर होतो. आजही तेच झाले.






























































