धारावी पुनर्विकासात हजारो लोकांना स्थलांतरीत करावे लागेल, डीआरपीच्या भूमिकेने तीव्र संताप

धारावी पुनर्विकास प्रकल्पात (डीआरपी) हजारो धारावीकरांना बाहेर स्थलांतरीत करावे लागेल, अशी भीती डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घातली आहे. त्याविरोधात धारावीत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. कल्याणकर यांनी त्यांच्या विधानाचा तातडीने खुलासा करावा; अन्यथा हजारो धारावीकर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि डीआरपीवर धडक देतील, असा इशारा धारावी बचाव आंदोलनाने दिला आहे.

झोपडपट्टी आहे तिथेच विकास केला पाहिजे असे राज्य शासनाचे धोरण आहे. ते अदानीसाठी बदलले तर नाही ना हे सरकारने जाहीर करावे, असे धारावी बचाव आंदोलनाचे नेते, माजी आमदार बाबुराव माने म्हणाले. हजारो धारावीकरांचे स्थलांतर करावे लागेल असे महेंद्र कल्याणकर कुणाच्या बळावर बोलत आहेत ते धारावीकर जनतेला ठाऊक आहे. मात्र एकही धारावीकर धारावीबाहेर जाणार नाही हे लक्षात ठेवा, असे माने यांनी ठामपणे सांगितले. अदानी जे बोलत नाहीत ते कल्याणकर बोलत आहेत असा आरोप त्यांनी केला. तसेच कल्याणकर यांनी भूमिका बदलली नाही तर धारावीकर यांना घेराव घालतील, असा इशाराही त्यांनी दिला.

कल्याणकर यांच्या विधानामुळे धारावीतील दहावी, बारावीचे हजारो विद्यार्थी धास्तावले आहेत. पालकही चिंतेत पडले आहेत. कारण महिनाभरानंतर परीक्षा सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत धारावीकरांना घराबाहेर काढायला जाल तर त्यांच्या संतापाच्या आगीचा अनुभव एकदा घेऊनच बघा, असे आव्हानही बाबुराव माने यांनी डीआरपीला दिले आहे. अदानींना दिलेल्या डंपिंग ग्राऊंड आणि डेअरीच्या जागांवरच धारावीकरांचे पुनर्वसन करण्याचा हा डाव नाही ना, असा सवालही त्यांनी केला आहे.

घराबाहेर काढणार नाही, लेखी आश्वासन द्या!

सगळय़ाच धारावीवासीयांना धारावीतच घरे देऊ असे लेखी आश्वासन अदानी कंपनी आणि राज्य सरकारच्या वतीने महेंद्र कल्याणकर यांनी द्यावे, अशी मागणी बाबुराव माने यांनी केली आहे. धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजू कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उलेश गजाकोश, आपचे एन.आर. पॉल, इशरत खान आदींनीही बाबुराव माने यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

गणेशनगर रहिवाशांच्या पुनर्वसनाचे काय?

मेघवाडी गणेशनगरमधील 42 रहिवाशांना रेल्वेच्या जागेत विकसित होत असलेल्या इमारतीत पक्क्या घरात स्थलांतरीत करू असे आश्वासन राज्य सरकार आणि अदानी कंपनीने दिले आहे. हे आश्वासन गुंडाळून सरकार व अदानी कंपनी येथील रहिवाशांना 18 हजार रुपये भाडे देऊन त्यांना धारावीबाहेरच हाकलत आहे, अशीही टीका बाबुराव माने यांनी केली आहे.