विमानात धमकीच्या अफवेचा फोन

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात काही आक्षेपार्ह असल्याचा फोन विमानतळावरील एअरपोर्ट कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये आज आला. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विमानात धमकीचे फोन येण्याचे प्रकार सुरूच आहेत. विमानात स्पह्टक ठेवल्याचे मेसेज, ई-मेल येत आहेत. आज पहाटे विमानतळावरील एअरपोर्ट कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये फोन आला. फोन करणाऱ्या महिलेने विमानाची माहिती विचारली. त्यानंतर त्या विमानाचे टेक ऑफ करू नका असे सांगितले. त्या विमानाचे टेक ऑफ करू नका काही तरी गडबड होण्याची शक्यता असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले.

मुंबईहून दिल्लीला जे विमान जाणार आहे त्या विमानात काही होणार असल्याचे महिलेने सांगून फोन कट केला. कॉन्टॅक्ट सेंटरमधील महिलेने तिला त्या विमानाच्या माहितीबाबत विचारले असता तिने माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळाने पुन्हा त्या कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये फोन आला. तिने यापूर्वी विमानात आक्षेपार्हबाबत फोन केल्याचे सांगितले. आपल्याकडे जी माहिती होती ती आपण दिली. विमानाच्या सुरक्षेस्तव त्या विमानाचे टेक ऑफ करू नका असे सांगून तिने फोन कट केला. याची माहिती विमानतळावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. भीतीदायक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.