मारहाण करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड, मुख्य आरोपी अद्यापि पसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाई म्हटले नाही म्हणून तरुणाला बेल्ट, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करणाऱ्या तसेच जमिनीवर बिस्किटे टाकून खायला लावणाऱ्या तीन आरोपींची वाकड पोलिसांनी मुंडन करून परिसरातून धिंड काढली.

प्रशांत सहदेव आठवले (26, गणेशनगर, थेरगाव), अजित उर्फ आदित्य सुनील काटे (20, रा. ताथवडे), प्रकाश भिवा इंगोले (21, रा. काळाखडक, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आणखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा अद्यापि पसार आहे. याप्रकरणी 26 जानेवारी रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना एका तरुणाला बेल्टने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार असून, त्याने तरुणाला मी या एरियाचा भाई आहे. माझ्या नादी कोणी लागले तर मी कोणाला सोडणार नाही, अशी धमकी दिली, तसेच जमिनीवर बिस्किटे टाकून ती खायला लावली. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली.

अटक केलेल्या आरोपींना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या तीनही आरोपींचे मुंडन करून परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, फौजदार गणेश तोरगल, संगीता गोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.