
मोटारीतून चाललेल्या वकील महिलेसह त्यांच्या पतीवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार गुंडासह तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी आठ तासांमध्ये अटक केली.
रितेश विजय कोंढरे (रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी), निलेश श्रीमंत थोरात (वय 20) आणि ओकांर सुरेश तांबे (वय 28, दोघेही रा. मोरेवस्ती, पद्मावती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अॅड. त्रिवेणी अतुल रूपटक्के (रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.
अॅड. त्रिवेणी रूपटक्के आणि त्यांचे पती अतुल रविवारी रात्री मोटारीतून हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या मोटारीला सराईत रितेश कोंढरे याने मोटार घासली. त्यानंतर अतुल यांनी आरोपीचा पाठलाग करून आंबेगाव बुद्रुकमध्ये थांबवून विचारपूस केली. त्याचा राग आल्यामुळे आरोपी रितेशने अतुल यांना गाडी घासली म्हणून काय झाले, तुला माहीत आहे का मी कोण आहे अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर रितेश आणि इतर दोन साथीदारांनी कोयता काढून अतुलवर उगारला असता अॅड त्रिवेणी यांनी मध्यस्थी केली.
हातावर कोयत्याचे वार झाल्यामुळे अॅड. त्रिवेणी गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर आरोपी रितेशच्या साथीदारांनी मोटारीतून बॅट काढून दोघांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, विजय पुराणीक यांनी धाव घेत तपासाला सुरुवात केली. त्यावेळी आरोपी कोरेगाव पार्कमधील पबमध्ये असल्याची माहिती अमलदार गणेश शेंडे आणि नवनाथ खताळ यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
























































