
लग्नघरी दरोडा टाकून 13 लाखांचे दागिने घेऊन पळून गेलेल्या तिघांना सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. निखिल सिंग, सचिन डोंगरे आणि यतीन सिंदरोजा अशी त्या तिघांची नावे आहेत. चोरीचे दागिने यतीनने एकाला दिले आहेत. पोलिसांनी तपास करून चोरीचे काही दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
तक्रारदार हे जुहू कोळीवाडा परिसरात राहतात. गेल्या महिन्यात तक्रारदार हे लग्नाच्या खरेदीसाठी गेले होते. तेव्हा त्याच्या घरात अज्ञात चोरटय़ाने घरफोडी करून 13 लाख 68 हजारांचे सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला होता. घडल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, कांबळे, परब, गोडसे, महाजन, शिरसाट, नवले यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील 35 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना मोटरसायकल दिसली. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सांताक्रूझ ते अंधेरी परिसरातील 35 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा एका फुटेजमध्ये पोलिसांना निखिल दिसला. त्यानंतर पोलिसांचे पथक मालवणी परिसरात गेले. तेथून निखिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर सचिनचे नाव समोर आले. सचिन कुठे राहतो हे निखिलला माहीत नव्हते. तपासादरम्यान पोलिसांना सचिनचा नंबर मिळाला. तो नंबर सतत बंद येत होता. सचिन हा विरारच्या मनवेलपाडा येथे असल्याची माहितीनंतर पोलिसांचे पथक विरारला गेले. पोलिसांनी सापळा रचून सचिनला ताब्यात घेतले. तो एका बसवर क्लिनरचे काम करत होता. सचिनच्या चौकशीत यतीनचे नाव आले. पोलिसांनी यतीनला अंधेरी परिसरातून ताब्यात घेतले. यतीन हा मुख्य सूत्रधार असून त्याने हा कट रचला होता. घरफोडीला जाण्यासाठी यतीनने त्याच्या नातेवाईकाची गाडी सचिनला दिली होती. यतीनने ते चोरीचे सोने एका जणाला दिले होते.
15 मिनिटांत करतात घरोफोडी
निखिल हा अवघ्या पंधरा मिनिटांत घरफोडी करतो. घरफोडी करण्यापूर्वी सचिन व निखिल हे दोघे रेकी करतात. रेकी केल्यानंतर ज्या इमारतीत सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा इमारतीतच घरफोडी करतात. घरफोडीच्या पैशातून ते नशा करतात. यतीनविरोधात 16, निखिलवर 10 तर सचिनवर 2 गुन्हे दाखल आहेत. लवकरच त्या तिघांना पालघर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

























































