खेड तालुक्यात तुटलेल्या वीजवाहिनीच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील सवणास येथे तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागल्याने रानात चरणाऱ्या तीन म्हशींचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून या घटनेला जबाबदार असणाऱ्या महावितरणने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

खेड तालुक्यातील सवणस खुर्द येथील एका शेतकऱ्याने नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी चारण्यासाठी रानात नेल्या होत्या. ज्या कुरणात म्हशी चरत होत्या त्याच कुरणात महावितरणची वीज वाहिनी तुटून पडली होती. कुरणात चरणाऱ्या म्हशी या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने तिन्ही म्हशींना विजेचा जोरदार धक्का बसला आणि तिन्ही म्हशींचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती शेतकरी आणि ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. मात्र, महावितरणचा एकही अधिकारी या दुर्घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

महावितरणच्या तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागून आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. अनेक पाळीव जनावरांचा बळी गेला आहे. मात्र, महावितरणकडून याबाबत काहीच ठोस उपाययोजना केली जात नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सवणस येथे घडलेल्या या दुर्घटनेला महावितरण जबाबदार असल्याने ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, त्याला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.