‘मोक्षप्राप्ती’साठी एकाच कुटुंबातील तिघांनी घेतला गळफास, शहापूरच्या जंगलात आढळले मृतदेह

suicide

मोक्ष मिळावा म्हणून दिवाळीच्या दिवशी एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. शहापूरच्या जंगलात या तिघांचे मृतदेह आढळले आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, चांदा गावचे रहिवासी असलेले नितीन भेरे, महेंद्र दुभेले आणि नितीन भेरे या तिघांचे ते मृतदेह आहेत. 14 नोव्हेंबरच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या रात्री हे तिघेही एकत्र बेपत्ता झाले होते.

महेंद्र आणि मुकेश हे दोघेही मामा भाचे असून नितीन यांचा नातेवाईक होता. नितीन हा स्वतःला मांत्रिक म्हणवून घेत असे. हे तिघेही बऱ्याचदा एखाद्या धार्मिक स्थळी एकत्र भेट देत असत. 14 नोव्हेंबरच्या रात्री ते बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. मात्र, त्यांचा पत्ता लागत नव्हता.

गुराख्याला सापडले मृतदेह

शहापूरच्या जंगलात गुरे चारायला घेऊन जाणाऱ्या एका गुराख्याला तीन मृतेदह एका झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळले. एकाच साडीने या तिघांनीही गळफास घेतला होता. मृतदेहांखाली दारूच्या बाटल्या आणि अन्य काही वस्तू होत्या. ते पाहून गुराख्याने ताबडतोब पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी या मृतदेहांची ओळख पटवली, त्यानंतर हे तीन मृतदेह वरील बेपत्ता तिघांचे असल्याचं निष्पन्न झालं.

नितीन याला मंत्र-तंत्राचं आकर्षण होतं. त्यामुळे दिवाळीच्या अमावस्येला मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, या अंधश्रद्घेतून या तिघांनी गळफास लावला असावा, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या