
कोरोना व्हायरसच्या आजाराबाबत देशातील नागरिकांना पंतप्रधान यांनी मोठा दिलासा दिला आहे. देशात सध्या तीन कोरोना लसींवर काम सुरू असून शास्त्रज्ञांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांचे उत्पादन सुरू होईल’, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. कमीत कमी वेळेत देशातील नागरिकांपर्यंत ही लस कशी पोहोचवायची याची ब्लू प्रिंटही तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनतेला संबोधित करताना म्हटले आहे.
‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू असल्याचे शास्त्रज्ञ आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)चे महासंचालक शेखर मांडे यांनी म्हटले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्यातून या कंपन्या कोरोना लसीवर काम करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाविरूद्धच्या लढाईत हिंदुस्थानी शास्त्रज्ञही मागे नाहीत. पुढील काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत, असे शेखर मांडे यांनी सांगितले.
झायडस कॅडिलाची कोरोनावरील लस क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱया टप्प्यात आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे. आता दुसऱया टप्प्यातील क्लिनिकल चाचणी ही देशाच्या विविध भागातील 1000 नागरिकांवर घेण्यात येणार आहे. भारत बायोटेक कंपनीद्वारे देशातील 12 केंद्रांवर कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. देशाच्या विविध भागांमध्ये लसचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.























































