
लोणावळा येथील एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे महामार्गावर मंगळवारपासून सलग तीन दिवसांसाठी टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी केलेल्या विनंतीनंतर मुंबई-पुणे महामार्ग व टोल प्रशासनाने हा निर्णय घेतला असून टोलमाफीसाठी भाविकांना टोलमाफीचे पत्र दाखवणे आवश्यक असणार आहे.
लोणावळा येथील एकवीरा देवीच्या यात्रेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, रायगड व उपनगरातील आगरी कोळी समाजासह विविध जातीधर्मातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे यावर तोडगा म्हणून खासदार सुरेश म्हात्रे यांनी यात्रेदरम्यान तीन दिवस टोल माफ करण्यात यावा, अशी विनंती केली होती. या मागणीला सकारात्मक उत्तर देत टोल प्रशासनाने मंगळवार ते गुरुवार या दरम्यान भाविकांसाठी टोलमाफी घोषित केली आहे.






















































