
परभणी शहरात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने तत्काळ संचारबंदी लागू केली आहे. शुक्रवारपासून तीन दिवस ही संचारबंदी असणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी 6 वाजल्यापासूनच पोलिसांनी सर्व रस्ते, नगर, कॉलनीसह महामार्गावर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईस तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात शुकशुकाट आहे.
परभणी जिल्हा कोरोनासाठी ग्रीन झोनमध्ये होता. शहराच्या तसेच जिल्ह्याच्या सीमा सर्वप्रथम परभणी जिल्ह्यात बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचाफैलाव झाला नाही. मात्र, गुरुवारी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात 21 वर्षांचा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने परभणी महानगरपालिका क्षेत्रासह परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्रात संचारबंदी लागू केली. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस संचारबंदी असणार आहे. या काळात रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा आणि स्वच्छता सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक चौकात, कॉलनी आणि नगरांच्या तोंडावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी होत आहे. विनाकारण फिरताना आढळल्यास कारवाईस तोंड द्यावे लागत आहे. ज्यामुळे परभणी शहरात केवळ वैद्यकीय सेवा, स्वच्छता कर्मचारी आणि काही अन्न वाटप करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे वाहने फिरताना दिसून येत आहेत. दररोज सकाळी 7 ते 11 या दरम्यान सुरू असणारी परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड, वसमत रोडवरील काळी कमान, जुना पेडगाव रोड, गंगाखेड रोड आणि पाथरी रोडवरील दुकाने कडकडीत बंद आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट असून हीच परिस्थिती पुढील दोन दिवस राहणार आहे.
























































