
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धाम ट्रेकिंग मार्गावर रविवारी झालेल्या भूस्खलनात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. मयतांपैकी दोन भाविक महाराष्ट्रातील नागपूर आणि जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले. गौरीकुंड-केदारनाथ ट्रेकिंग मार्गावरील चिरबासा परिसराजवळ सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली. रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी ही माहिती दिली.
भूस्खलनामुळे डोंगरावरुन दगड आणि मातीचा ढिगारा भाविकांच्या अंगावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले.
किशोर अरुण पराते (रा. नागपूर, महाराष्ट्र), सुनील महादेव काळे (रा. जालना, महाराष्ट्र) आणि अनुराग बिष्ट अशी मयतांची नावे आहेत. इतर आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरू असल्याचे एसडीआरएफने सांगितले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करत दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. “दुर्घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अपघातात जखमी झालेल्यांना चांगले उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”, असे धामी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.