महाबळेश्वरमधील तिघे सावित्री नदीत बुडाले

महाड तालुक्यातील सावित्री नदी किनारी असलेले सव येथील दर्गा दर्शनासाठी गेलेले महाबळेश्वरमधील तिघे तरुण नदीमध्ये बुडाले. तिघेही गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी पाण्यात उतरले होते. तिघांचे मृतदेह सापडले असून, महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. बुडालेल्या तिघांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.

मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद (वय 38), दिलावर शहाबुद्दीन नालबंद (वय 28) हे दोन सख्खे भाऊ व रांजणवाडीमधील जाहीद जाकीर पटेल (वय 28) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

मुन्नवर नालबंद हे पत्नी, तीन लहान मुलांसह सख्खा भाऊ दिलावर व त्याचा मित्र जाहीद पटेल असे एकूण सातजण आज सकाळी महाबळेश्वरमधून महाड येथील सावित्री नदीकिनारी असलेल्या सव येथील दर्ग्यामध्ये दर्शनासह गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी गेले होते. यावेळी सावित्री नदीपात्रात पोहण्यासाठी तिघेही एकत्रित उतरले होते. बराच वेळ झाला तरी तिघे बाहेर येत नसल्याचे पाहून मुन्नवर यांच्या पत्नीने आराडाओरड केली. यावेळी परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी घटनेची माहिती महाड पोलिसांना दिली. घटना समजताच, एनडीआरएफचे बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीपात्रात शोध सुरू केला. साडेचार वाजण्याच्या सुमारास दोघांचे, तर पाच वाजण्याच्या दरम्यान तिसऱया युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. महाड रुग्णालयामध्ये तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून, युवकांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.