पन्नास लाखांच्या खंडणीसाठी पुण्यातून तिघांचे अपहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

पन्नास लाखांच्या खंडणीसाठी मार्केटयार्ड येथून तिघांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ सुत्रे हलवत काही तासांत श्रीगोंदा येथून तिघांना ताब्यात घेतले आहे. अपहरणामागील नेमके कारण अद्यापि समोर येऊ शकले नाही.

प्रवीण शिर्के, विजय खराडे आणि विशाल मदने (रा. तिघेही नगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचे इतर साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मूळ मुंबईतील परंतु पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या कॉण्ट्रक्टरसह त्याच्या दोन साथीदारांचे आरोपींनी गुरुवारी (दि.12) दुपारी अपहरण केले. यानंतर अपहरण करण्यात आलेल्यांमधील एका व्यक्तीच्या फोनवरून त्याच्या भावाशी संपर्क केला. तिघांना सोडवायचे असल्यास पुण्यातील एम. जी. रस्ता येथील एका अंगडीयाकडे 50 लाख रुपये देण्याची मागणी आरोपींनी केली. याबाबत त्याने शुक्रवारी सकाळी मार्केटयार्ड पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली होती. माहिती मिळताच, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपासाकरून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही आणि इतर माहितीवरून आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. यानुसार पथकाने नगर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून श्रीगोंदा येथील एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी काही आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या ताब्यातून एक फॉर्च्यूनर आणि एक क्रेटा अशा दोन चारचाकी गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे, नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, क्रांतिकुमार पाटील, अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.