बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग, तिघे निलंबित; चौकशीसाठी समिती

ससून रुग्णालयाशी संलग्न असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सिनियर निवासी डॉक्टरांकडून ज्युनियर निवासी डॉक्टरांवर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली असून, मंत्रालयातून चक्रे फिरल्यानंतर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ससून प्रशासनाने तत्काळ समिती स्थापन करून चौकशी सुरू केली आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार विभागात पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या ज्युनियर डॉक्टरांना त्याच विभागातील तीन सिनियर निवासी डॉक्टर कधी अंगावर गार पाणी, तर कधी गरम पाणी ओतून घ्यायला लावत, तर कधी शिवीगाळ करत. रॅगिंग त्रास गेल्या काही दिवसांपासून सहन करावा लागत असल्याने एका ज्युनियर डॉक्टरने अस्थिव्यंगोपचार विभागाकडे तक्रार केली. मात्र, महाविद्यालय पातळीवर दखल न घेतल्याने या पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांनी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडेच तक्रार केली. मंत्रालय पातळीवरून चक्रे फिरल्यानंतर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

तिघांवर निलंबनाची कारवाई तक्रारदार निवासी डॉक्टरच्या आईने सोमवारी (दि.28) दुपारी ससून रुग्णालयाच्या प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ससून प्रशासनाने तत्काळ बैठक घेऊन चौकशी समिती नेमली व या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ज्यांच्या विरोधात तक्रार आली आहे, त्या तिघांना सोमवारीच निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांना वसतिगृहातूनही काढून टाकले आहे. चौकशी समितीची मंगळवारी (दि.29) रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.

कोणालाही सोडले जाणार नाही
याप्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीकडून मंगळवारीही चौकशी सुरू होती. यात तक्रारदारांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेतले. ज्यांच्या विरोधात तक्रार आली आहे, त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. समितीकडून या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. अँटी रॅगिंग कायद्याअंतर्गत पुराव्यानिशी जसे रॅगिंगचे स्वरूप असेल, त्यानुसार दोषींवर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही, असेही डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले.

यापूर्वीही रॅगिंगचे प्रकार
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग होण्याचा ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2006 मध्ये महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर रात्री 10 वाजता वरिष्ठ विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ खेळण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. तर, 2024 मध्येही पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना टार्गेट करून रॅगिंग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.