
सामना ऑनलाईन। श्रीनगर
पुलवामाच्या हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम अधिक उग्र केली आहे. रविवारी कुलगाम येथे लष्कराच्या पथकाशी उडालेल्या धुमश्चक्रीत जैश ए मोहमंदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षक अमन ठाकूर यांच्यासह लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपलेले असून, रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती.
कुलगाम जिल्हय़ातील तुरीगाम येथे एका घरात दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ तसेच स्थानिक पोलिसांच्या पथकाने नाकेबंदी केली. कोंडी झालेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्याला तडाखेबंद उत्तर दिले. या धुमश्चक्रीत जैश ए मोहमंदचे तीन दहशतवादी ठार झाले, तर पोलीस उपअधीक्षक अमन ठाकूर हे गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या चकमकीत लष्कराचा एक मेजर दर्जाचा अधिकारीही शहीद झाला.
‘बंद’मुळे कश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत
केंद्र सरकारने फुटीरतावाद्यांविरोधात कठोर पावले उचलल्याने ‘जॉइंट रेजिसटन्स लीडरशिप’ या फुटीरतावाद्यांच्या संयुक्त कृती समितीने आज कश्मीरमध्ये बंद पाळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या बंद वेळी पोलिसांनी श्रीनगरमधील पाच पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात जमावबंदी लागू केली होती. कश्मीर खोऱयात बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
























































