शामा पहिलवानच्या खूनानंतर जमावाकडून दोघांची हत्या, संचारबंदी लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुगाराच्या खेळातून झालेल्या भांडणात सोमवारी दुपारी शामा पहिलवानचा खून झाला. यानंतर संतप्त जमावाने दोघा जणांची हत्या केली आहे. अचलपूर -परतवाडा या जुळ्या शहरात 3 खूनांच्या घटनेमुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अचलपूर व परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी 12 वाजता शामा पहिलवानचा खून झाल्यानंतर याचे संतप्त पडसाद जुन्या शहरात उमटले. यावेळी जमलेल्या जमावाने संपूर्ण बाजारपेठ बंद करुन जोरदार दगडफेक केली. जमावाने केलेल्या हिंसक हल्ल्यात अतिक चिकनवाला (42) व कपडा व्यवसायीक सैफ अली मो. कमाल (24) यांचा मृत्यू झाला आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यात इतरही 5 जण जखमी झाल्याची माहिती असून त्यांना अचलपूरच्या ग्रामीण व अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अचलपूर व परतवाड्यात दरवर्षी दुर्गोत्सव साजरा होतो. त्यावेळी नेहमीच जातीय तणावाच्या घटना घडत असतात. तिच पार्श्वभूमी आजच्या खूनाच्या घटनेला असल्याची चर्चा आहे. तसेच सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने पोलिसांनी पूर्व खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्यानंतरही हा हिंसाचार उफडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरले असून प्रशासनातील सर्व उच्च पदस्थ पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.