नवरात्रीनिमित्त अंबाजी दर्शनाला गेलेल्या भक्तांची बसला बनासकांठा येथे अपघात झाला. या अपघातात 3 प्रवाशी ठार झाले तर 25 जण जखमी झाले. त्रिशूलिया घाटीमध्ये ही घटना घडली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाने मद्य प्राशन केले होते. तसेच गाडी चालवत असतानाच मोबाईलवर रील्स बनवत असल्याने हा अपघात घडला.
अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बसमध्ये एकूण 60 प्रवाशी होते. सर्वजण सोमवारी अंबाजी दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना सकाळी साडे आठच्या सुमारास त्रिशूलिया घाटीत चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस वीजेच्या खांबावर आदळून उलटली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमींना तात्काळ पालनपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तर अन्य जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने अंबाजी रुग्णालयात नेले. प्रवाशांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.