
सामना प्रतिनिधी । जालना
राजूर येथील बाफना ज्वेलर्सच्या मालकाला 24 मे रोजी राजुर रोडवरील घाणेवाडी पाटीजवळ अडवून गावठी पिेस्तुलचा धाक दाखवून लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला जालना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजुर येथील बाफना ज्वेलर्सचे मालक विनयकुमार बाफना व त्यांचा मुलगा नवनीत बाफना 24 मे रोजी कारने राजुरहून जालना शहराकडे जात असताना त्यांना या टोळीने लुटले होते.
घाणेवाडी पाटी जवळ बाफना यांच्या कारला आपली कार आडवी घालून मागून एका कारने धडक दिली. बाफना यांची कार दोन गाड्यांमध्ये अडवण्यात आली. त्यांच्या कारच्या काचा लोखंडी रॉडने तोडून बाफना आणि त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर गावठी पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडूल सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकम हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक गौर यांना खबऱ्यांमार्फत 30 जूनला माहिती मिळाली की, राजुर रोडवरील दरोडा प्रशांत अंकुश हिवाळे याने त्याच्या साथीदारासह घातला आहे. या माहितीवरुन आरोपी संभाजीनगर परिसरातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक गौर पथकासह संभाजीनगरमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रशांत हिवाळेला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर त्याचे साथीदार विजय जईद ,गणेश बदर यांच्या व इतर साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. त्यावरुन सापळा लावून इतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनीही गुन्ह्याची केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 7 लाख रुपये किंमतीच्या दोन कार, लोखंडी रॉड, तलवार व 1 लाख 58 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, चांदीचे 6 शिक्के व 22 हजार रुपये असा एकूण 8 लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील तिन्ही दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.



























































