गणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले

4

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

पुणे जिल्ह्यातील दौंड येथून गणपतीपुळ्यात फिरण्यासाठी आलेले तीन पर्यटक बुडाले. या बुडणार्‍या पर्यटकांना जीवरक्षक आणि छायाचित्रकारांनी जीवाची बाजी लावून वाचवले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पगार नसल्यामुळे १२ जीवरक्षकांऐवजी फक्त एका जीवरक्षकांवर गणपतीपुळे किनारपट्टी सुरक्षा अवलंबून आहे. शनिवारी किनारपट्टीवरील छायाचित्रकार मदतीला धावले म्हणून तिघांचे प्राण वाचले.

पुणे दौंड येथून बारा पर्यटकांचा एक समुह शनिवारी गणपतीपुळ्यात फिरण्यासाठी आला होता. त्यापैकी तिघेजण समुद्रात पोहायला गेले असता बुडाले. आपण बुडत असल्याची जाणीव होताच तिघांनी वाचण्यासाठी आरडाओरडा सुरु केला. किनारपट्टीवर एकच जीवरक्षक होता. त्याच्या जोडीला किनारपट्‌टीवरचे छायाचित्रकार आणि अन्य व्यावसायिक आले आणि त्यांनी क्षणाचा विलंब न लावता समुद्रात उड्या मारल्या. समुद्रात बुडालेल्या नंदकुमार अशोक खापरे (30), पुजा नंदकुमार खापरे (23) या दांपत्याला आणि प्रवीण खापरे अशा तिघांना पाण्यातून बाहेर काढले. जीवरक्षक अक्षय मानेसह निखील सुर्वे, विरेंद्र सुर्वे, दिनेश मयेकर यांनी या बचावकार्यात सहभाग घेतला.