
वर्गामध्ये मस्ती केल्याच्या कारणातून दहावीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाना पेठेतील ऑर्नेलाज हायस्कूल मध्ये घडली. विद्यार्थ्यांनी गुडघ्यावर बसून माफी मागितल्यानंतर देखील त्यांना मारहाण केली. याप्रकरणी तिघा शिक्षकांविरोधत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अँन्थोनी बेकिल डिसोझा, गणेश मारुती धोकडे आणि फरीद मेहबूब पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका विद्यार्थ्याच्या पालकाने फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि.28 जुलै) दुपारी हा प्रकार घडला.
फिर्यादी यांचा मुलगा या शाळेत इयत्ता दहाव्या मध्ये शिकत आहे. त्यांचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र वर्गात धिंगाणा घालत होते. म्हणून अँन्थोनी सर यां शिक्षकाने त्यांना वर्गाच्या बाहेर काढून छडीने मारहाण केली. त्यानंतर त्यांना स्टाफ रुममध्ये नेले. तिथे विद्यार्थ्यांनी गुडघ्यावर बसून माफी मागितल्यानंतरही धोकडे, पटेल यां शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. तसेच, पटेल यांनी तिघा विद्यार्थ्यांना इंटर्नल गुण न देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शाळा सुटल्यावर फिर्यादींचा मुलगा घरी आला. तो खूप घाबरला असल्याने पालकांनी त्याला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर हा प्रकार समोर आला. समर्थ पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































