
लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आठवडाभरापासून चकमक सुरूच असून आज तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. जम्मू आणि कश्मीरच्या कुपवाडा जिह्यातील केरन सेक्टर येथील नियंत्रण रेषेजवळ लष्कराने ही कारवाई केली. यावर्षी केरन सेक्टरमध्ये मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी झाली होती. या पार्श्वभूमीवर घुसखोर दहशतवाद्यांना पकडण्याचे मोठे आव्हान लष्करासमोर आहे.
उरी आणि बारामुल्ला सेक्टर येथे दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी सुरू असून मारले गेलेले दहशतवादी नियंत्रण रेषेतून हिंदुस्थानात घुसले होते अशी माहिती लष्कराच्या चिनार कोरच्या अधिकाऱयांनी एक्सवरून दिली. केरन सेक्टर येथील खोऱयात दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली. लष्कराने दहशतवाद्यांना आव्हान देताच दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले.
केरन सेक्टरमधून घुसखोरी
हिंदुस्थानात जम्मू-कश्मीर येथील केरन सेक्टरमधून मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी पर्यटनाला चालना देण्यासाठी सीमा रेषा खुली केली. त्यानंतर पर्यटन वाढल्याचा दावा केला जात आहे. मात्र, घुसखोरीमुळे दहशतवादी हल्ले होत असल्याकडे मात्र एनडीए सरकारचे साफ दुर्लक्ष होत असल्याची टीका आता होत आहे.