3 हजार 239 उमेदवार लढणार निवडणूक, चिपळूणमध्ये सर्वात कमी उमेदवार

421

राज्यभरात 288 मतदारसंघांत 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट झाले. चिपळूण मतदारसंघात सर्वात कमी 3 तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. विविध मतदारसंघांत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 3 हजार 239 उमेदवार रिंगणात आहेत. अकोले, शहादा, बोरिवली, माहीम, वांद्रे पश्चिम या मतदारसंघांत प्रत्येकी चार उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर या मतदारसंघातून 91 उमेदवारांनी अर्ज भरला होता, मात्र अर्ज मागे घेतल्यानंतर आता तिथे फक्त 7 उमेदवार रिंगणात आहेत. 15 उमेदवारसंख्येपर्यंत 1 बॅलट युनिट, 35 उमेदवार असतील तिथे 2 बॅलट युनिट लावण्यात येणार आहेत. त्यापेक्षा जास्त उमेदवार असतील तिथे 3 बॅलट युनिट लावण्यात येणार आहेत.

31 ऑगस्टपासून 2 लाख मतदार वाढले

मतदार यादीत 40 लाख बोगस मतदार असल्याचा दावा बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यावर मतदार याद्यांचे सातत्याने पुनरिक्षण केले जाते. पुनरिक्षणावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येतो. असे 1 लाख 10 हजार प्रतिनिधी नेमण्यात आले होते. त्यानुसार 31 ऑगस्टपासून ते आतापर्यंत 2 लाख मतदारांची वाढ झाल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

आशीष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल

नागपूर पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशीष देशमुख अशी लढत आहे. आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक अर्ज प्रतिज्ञापत्रासंदर्भात निर्माण झालेल्या वादाकरून स्थानिक निवडणूक अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रार केली आहे. ही तक्रार तपासून लककरच निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती दिलीप शिंदे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या