दुचाकी, मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांना अटक; 02 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरात दुचाकी , मोबाईल चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून पाच दुचाकी आणि तीन मोबाईल असा दोन लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रविवारी माहिती मिळाली की, पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील मोटारसायकल घेऊन बाभळगाव चौकात एक जण उभा आहे. माहिती मिळाल्याने पथक तात्काळ बाबळगाव चौकात पोहचले. तेथे मोटरसायकलसह थांबलेल्या व्यक्तीला विश्वासात घेत त्याची चौकशी केली. त्याने त्याचे नाव सुशांत शिवाजी गायकवाड (वय 23, रा. म्हाडा कॉलनी, लातूर) असे सांगितले.

त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोटारसायकल काही दिवसांपूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील व पाखरसांगवी परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. दोन साथीदारांसह लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखी मोटारसायकली चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरून महादेव दिलीप समुखराव (वय 20, रा. राजीवनगर बाभळगाव रोड, लातूर), कृष्णा गुंडेराव लोंढे (वय 19, रा.म्हाडा कॉलनी, लातूर) यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली.

लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकल, चोरीचे तीन मोबाईल असा एकूण 02 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकाने त्यांचे मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.