
वरळी येथील सास्मिरा कॉलेजमध्ये नुकताच एकदिवसीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार रंगला. राजन जोथाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बॉक्सिंगसारख्या कठीण आणि शिस्तबद्ध खेळाबद्दल आवड निर्माण करणे तसेच शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता.
या स्पर्धेत मुंबईतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये झालेल्या लढतींमध्ये खेळाडूंनी जबरदस्त ताकद, चपळता आणि तांत्रिक कौशल्य दाखवले. सर्व सामने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियमांनुसार पार पडले.
स्पर्धेचे उद्घाटन कॉलेजच्या उपाध्यक्ष स्मिता येवले, महासंचालक डॉ. अशोक तिवारी आणि प्राचार्य डॉ. आशिष चुटके यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत खेळातही सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आले. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक बळ आणि शिस्त निर्माण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना पदके, प्रमाणपत्रे आणि विशेष चषक देऊन गौरवण्यात आले.

























































