विहिरीत पडलेल्या बिबट्याचे थरारक रेस्क्यू, चार मिनिटांत वनविभागाची यशस्वी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
राजापूर तालुक्यातील मौजे जुवाठी-शिर्केवाडी येथे आज सकाळी रामचंद्र नारायण भारती यांच्या मालकीच्या विहिरीत एक बिबट्या पडला होता. त्याबाबत सकाळी सुमारे 9 वाजता पोलीस पाटील यांनी वनविभागाला माहिती दिली.
ही माहिती मिळताच परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांनी तत्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, वनपाल व वनरक्षकांसह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पाहणीदरम्यान बिबट्या विहिरीतील दगडावर बसलेला आढळून आला. संबंधित विहीर सुमारे 35 ते 40 फूट खोल असल्यामुळे परिस्थिती गंभीर होती. वनविभागाने तत्परता दाखवत आज सकाळी 11.05 वाजता दोरीला बांधलेला पिंजरा विहिरीत सोडला. अवघ्या चार मिनिटांत म्हणजेच 11.09 वाजता बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. या धाडसी आणि अचूक कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
त्यानंतर पशुधन विकास अधिकारी राजापूर डॉ. वेर्लेकर यांनी बिबट्याची तपासणी केली असता तो पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित बिबट्या मादी जातीचा असून तिचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे असल्याचे सांगण्यात आले.यानंतर विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड आणि वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.या यशस्वी मोहिमेत वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य दीपक चव्हाण, निलेश म्हादये, नितेश गुरव, संदीप जाधव, साहील जांगळी यांच्यासह ग्रामस्थांनीही सहकार्य केले.