
सामना प्रतिनिधी । नागपूर
महाराजबागेत मागील 11 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बाल्या नामक बिबट्याचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे शनिवारी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. मागील आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारा 14 वर्षीय बाल्याचा जीवनप्रवास शनिवारी सकाळी थांबला.
गावामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या या बिबट्याला धाबा वनपरिक्षेत्रातील मौजा- सराडी जिल्हा चंद्रपूर येथून 14 नोव्हेंबर 2008 मध्ये जेरबंद करुन महाराजबागेत आणण्यात आले होते. प्राणीसंग्रहालयातील बाल्या नावाच्या बिबट्याचा मृत्यू मूत्रपिंडाच्या आजाराने झाला. आठ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसापूर्वी त्याने अन्नपाणी सोडले होते. सलाईनच्या माध्यमातून त्याला अन्न पुरविले जात होते. मात्र शनिवारी त्याचा मृत्यू झाला. बिबट्याचे शवविच्छेदन डॉ. प्रशांत सोनकुसरे आणि डॉ अभिजीत मोटघरे यांनी केले. महाराजबागेत त्याच्यावर सकाळी 11.15 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ. सुनील बावस्कर, डॉ. अभिजीत मोटघरे व डॉ. प्रशांत सोनकुसरे तसेच प्राणीसंग्रहालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. बिबटाचे शवविच्छेदनात मुत्रसंस्थेच्या विकारातून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर याचवर्षी महाराजबागेतील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली जाई नामक वाघिणीचा मृत्यू मार्च 2018 मध्ये झाला. तर तब्बल 18 वर्षापासून वास्तव्य असणाऱ्या अजय नामक बिबटाचा मृत्यू एप्रिल 2018 मध्ये झाला होता.


























































