टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर हिंदुस्थानला धक्का; तिलक वर्मावर यशस्वी शस्त्रक्रिया, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकणार

टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर हिंदुस्थानी क्रिकेटला जबर धक्का बसला आहे. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात विजेतेपदाची मोहोर उमटवणारा युवा फलंदाज तिलक वर्मा गंभीर दुखापतीमुळे शस्त्रक्रियेला सामोरा गेला असून, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे. इतकेच नव्हे, तर त्याचा टी-20 वर्ल्ड कपमधील सहभागाबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

21 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत तिलकला विश्रांती देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. तसेच शेवटच्या दोन सामन्यांना तो खेळणार की नाही ते त्याच्या फिटनेसवरूनच ठरवले जाईल. त्यामुळे व्यवस्थापनाची चिंता अधिक वाढलेली आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्याच्या जागी नव्या खेळाडूची निवड होण्याची शक्यता आहे.

आशिया चषकाचा हीरो, आता रुग्णालयात

आशिया चषक टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिलकने नाबाद 69 धावांची धडाकेबाज खेळी करत हिंदुस्थानच्या विजयाचा कौल बदलला होता. दबावाच्या क्षणी संयम आणि आक्रमकतेचा अफलातून मिलाफ दाखवणारा तिलक हा टी-20 संघाचा भविष्यातील आधारस्तंभ मानला जात होता, मात्र अचानक आलेल्या या दुखापतीमुळे विश्वचषकाच्या तयारीला मोठा खीळ बसल्याचे चित्र आहे.

राजकोटमध्ये अचानक वेदना

7 जानेवारी रोजी सकाळी राजकोटमध्ये नाश्ता केल्यानंतर तिलकला शरीराच्या खालच्या भागात अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तो विजय हजारे ट्रॉफीसाठी हैदराबाद संघासोबत राजकोटमध्ये होता. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तिलकला तत्काळ गोपुळ रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी व स्पॅनमध्ये त्याला ‘टेस्टिक्युलर टॉर्शन’ म्हणजेच अंडकोश पिळवट ही गंभीर वैद्यकीय समस्या असल्याचे निदर्शनास आले. या आजारात विलंब झाल्यास धोका वाढू शकतो, ‘तज्ञ डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. तिलक वर्माची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या त्याची प्रपृती स्थिर आहे,’ असे बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

विश्वचषकाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह

तिलकच्या अनुपस्थितीमुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका तसेच टी-20 विश्वचषकापूर्वीची अंतिम तयारी प्रभावित होण्याची शक्यता आहे. मधल्या फळीत स्थैर्य देणारा आणि गरजेच्या वेळी आक्रमक भूमिका निभावणारा तिलक सध्या संघासाठी महत्त्वाचा दुवा ठरला होता. त्यामुळे त्याची दुखापत ही केवळ एका खेळाडूची अनुपस्थिती नसून हिंदुस्थानी क्रिकेटसाठी गंभीर इशारा मानला जात आहे.