
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईटजवळील प्रसिद्ध शिवकुंडेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त महिला भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणारा टेम्पो ३० फूट खोल दरीत कोसळल्याने १० महिलांचा मृत्यू झाला, तर २८ महिला गंभीर जखमी झाल्या. पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्यादरम्यान असणाऱ्या घाटात वळणावर दुपारी १२च्या सुमारास ही घटना घडली.
शोभा ज्ञानेश्वर पापळ, सुमन काळुराम पापळ, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मीराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरत्रे, पार्वताबाई दत्तू पापळ, फसाबाई प्रभू सावंत अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. तर, जखमींमध्ये टेम्पोचालक ऋषिकेश रामदास करंडे (वय २५, रा. पाईट) याच्यासह चित्रा शरद करंडे, चंद्रभागा दत्तात्रय दरेकर, मंदा चांगदेव पापळ, लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, कविता सारंग चोरगे, छबाबाई निवृत्ती पापळ, मनीषा दरेकर, जनाबाई करंडे, हंसाबाई सावंत, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे, सुलोचना कोळेकर, मंगल दरेकर, लता करंडे आदींचा समावेश आहे.
पाईटजवळ शिवकुंडेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात. आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने पाईटजवळील पापळवाडी गावातील काही महिला दर्शनासाठी ऋषिकेश करंडे याच्या पिकअप टेम्पोतून कुंडेश्वर येथे निघाल्या होत्या. पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्यादरम्यान असणाऱ्या एका नागमोडी वळणावर टेम्पो चढावरून खाली घसरला. चालकाने ब्रेक दाबून गाडी थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, चालकाला टेम्पोवर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले आणि रिव्हर्स येत टेम्पो रस्ता सोडून ३० फूट खोल दरीत कोसळला. तीन ते चार वेळा गटांगळ्या घेत टेम्पो कोसळल्याने महिला गंभीर जखमी झाल्या. यात १० महिलांचा मृत्यू झाला, तर २८ जणी जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच राजगुरूनगर, तसेच महाळुंगे एमआयडीसी ठाण्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी सांगितले.
मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत
‘हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. जखमींना जवळच्या शासकीय, तसेच खासगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे,’ असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जखमींवरील उपचारांचा खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नातेवाईकांकडून पैसे न घेण्याची सूचना त्यांनी खासगी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.
बांगड्यांचा खच, चपलांचा ढीग
अपघातस्थळावर जागोजागी फुटलेल्या बांगड्यांचा खच आणि चपलांचा ढीग पडला होता. सोबत आलेल्या आपल्या शेजारणीचा मृतदेह पाहून महिलांना अश्रू अनावर झाले होते. सैरभैर झालेल्या महिलांना काय करावे समजत नव्हते. यावेळी अपघातस्थळावरील आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी महिलांना सावरले. खासगी गाड्यांमधून तातडीने त्यांना पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच आजूबाजूच्या दवाखान्यांमध्ये हलवण्यात आले.