सुंदर मी होणार –  केसांना कलर करताना…

>> संजीवनी धुरी-जाधव

अलीकडे  केसांवर वेगवेगळे प्रयोग करायला सगळय़ांनाच आवडतं. स्टायलिस्ट, हटके लूक दिसण्यासाठी केसांवर वेगवेगळय़ा ट्रिटमेंट केल्या जातात. त्यात केसांना कलर करणेही आलेच. केसांना कलर केल्यावर फार छान दिसतात, मात्र त्यांची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. वेळच्या वेळी त्यांची निगा राखणेही अत्यंत गरजेचे आहे, तरच केसांचे आरोग्य चांगले राहील.

तीन दिवस घ्या काळजी

केसांना कलर केल्यानंतर किमान तीन दिवस केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. केसांना पाणी लावू नये, अन्यथा रंग निघून जाण्याची शक्यता असते. केसांना कलर करताना त्यावर रासायनिक प्रक्रिया झाल्याने केसांचे क्युटीकल्स खुली होतात आणि त्यामुळे केसांवर परिणाम होऊ शकतो. केस कोरडे होऊन ते तुटण्याची शक्यता असते.

कलर सेफ शॅम्पूचा वापर करा

तुम्ही वापरत असलेला शॅम्पू हा केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो, जेव्हा केस धुता तेव्हा कलर-ट्रिटमेंट केलेल्या केसांसाठी खास तयार केलेला शॅम्पूचा वापर करणे गरजेचे असते. हा शॅम्पू केसांचे संरक्षण करून त्यांचे नैसर्गिक पीएच लेव्हल संतुलित ठेवतं. केसांवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया केल्यावर केसांचा रंग टिकून राहण्यासाठी ठरावीक शॅम्पू वापरण्याचा सल्ला देतात. केसांचा रंग टिकून राहण्यासाठी खास शॅम्पू असतो. तो शॅम्पू केसांना पोषण देऊन केसांचे नैसर्गिक पीएच योग्य ठेवतो. कलर सेफ शॅम्पू केसांचा रंग टिकविण्याबरोबरच केसांची काळजीही घेतात. त्यात आवश्यक घटक असतात जे केसांच्या पोषणासाठी आवश्यक असतात. सल्फेट आणि अल्कोहोल घटक असलेले शॅम्पू शक्यतो टाळलेलेच बरे.

कलर केस वारंवार धुतलेले न बरे

अनेकांना नियमित केस धुण्याची सवय असते, पण सतत केस धुतल्याने केस कोरडे होतात. त्यात केसांना कलर केल्यानंतर केस सारखे न धुता आठवडय़ातून दोनदा धुवा. कलर केलेले केस वारंवार धुतल्याने केसांचा रंग लवकर निघून जाईल आणि रंग फिका पडण्याची शक्यता असते. तसेच वारंवार धुण्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस कोरडे पडायला लागतात. त्याने केस निस्तेज दिसू लागतात. प्रदूषण, धूळ याचा केसांवर परिणाम होत असतो. अशा वेळी केस स्वच्छ करण्यासाठी ड्राय शॅम्पूचा वापर करणे, त्यामुळे केस धुतल्यानंतर रंगावर परिणाम न होता केसातील धूळ निघून जाण्यास मदत होईल.

कंडिशनरचा वापर करा

 केसांना कलर सेफ शॅम्पू वापरताना कंडिशनरही तसेच निवडा. कंडिशनरमुळे केस मुलायम होऊन केसांना वेगळी चमक येते.

उच्च तापमान टाळा

 केस हे कायम थंड किंवा कोमट पाण्याने धुवा. तसेच केसांवर हेअर स्ट्रेटनिंग, ब्लोड्रायर्ससारख्या मशिन्सचा वापर करणेही केसांसाठी हानिकारक ठरू शकते. उष्णतेमुळे कलर केसांचे क्युटिकल खुले होतात आणि रंग निघून जाऊ शकतो.

 सतत रंग लावू नका

केसांवर वारंवार रंगाचा प्रयोग करणे केसांना हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दर पाच ते सहा आठवडय़ांपेक्षा जास्त कलर करू नका.

आहार महत्त्वाचा

 लोह आणि प्रथिनेयुक्त आहाराने केसांना पोषण मिळून केस मजबूत होतात. केसांची रचना सुधारते आणि केस वाढण्यास मदत होते. कलर केलेले केस चांगले दिसण्यासाठी मांस, मासे, कमी चरबीयुक्त चीज, अंडय़ाचा पांढरा भाग, पालक यांचा आहारात समावेश करावा.

डिप कंडिशनिंग महत्त्वाची

आठवडय़ातून एकदा कलर केसांना कोमल आणि चमकदार करण्यासाठी डिप कंडिशनिंगचा वापर करा. आठवडय़ातून एकदा कलर केसांना डिप कंडिशनिंग करा. केसांच्या मुळापासून टोकापर्यंत केसांना कंडिशनिंग करून केसांना आंबोडा घाला. त्यानंतर अर्धा तास केसांना एका सॉफ्ट टॉवेलने गुंडाळून ठेवा. त्यानंतर केस धुतल्यावर केस कोमल, चमकदार दिसतात.