
>> संजीवनी धुरी-जाधव
तेलकट त्वचा ही अनेकांची समस्या आहे. तेलकट त्वचेमुळे चेहऱयावर धूळ, प्रदूषण या सगळ्य़ाचा परिणाम होत असतो. त्याने पिंपल्स, ब्लॅकहेड्ससारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे असते.
आपल्या त्वचेमध्ये तेलग्रंथी असतात. त्यातून सतत तेल स्रवण होत असते. त्वचा मॉईश्चराईज ठेवण्यासाठी या ग्रंथीची मदत होत असते. मात्र त्वचेमध्ये तेलग्रंथींची संख्या अधिक असल्यास चेहरा तेलकट दिसू लागतो. यावर महागडी उत्पादने लावूनही फारसा फरक दिसत नाही. मग त्याचा त्रास वाटू लागतो. चेहऱयावर पिंपल्स येण्याचे प्रमाणही वाढते अशावेळी तेलकट त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. जाणून घेऊया तेलकट त्वचेबाबत.
टोनरचा वापर कराः टोनर हे तेलकट त्वचेसाठी उत्तम पर्याय मानला जातो. टोनरने त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी मदत होते. त्यासाठी दिवसातून दोन वेळा टोनरचा वापर करावा. टोनरचा वापर करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा आणि त्यानंतरच त्याचा वापर करावा. टोनर वापरल्याने तुमची त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि चेहऱयावरील चिकटपणादेखील दूर होतो.
फेसपॅक वापराः तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी फेसपॅक हा प्रभावी उपाय होऊ शकतो. तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती फायदेशीर मानली जाते. मुलतानी मातीत दही आणि त्यात लिंबाता रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱयावर लावावे. काहीवेळ चेहऱयावर लेप तसाच ठेवून मग चेहरा स्वच्छ धुवावा. आठवडय़ातून तीन वेळा या फेसपॅकचा वापर करावा.
मॉईश्चरायझरचा वापरः तेलकट त्वचा असलेल्यांना गैरसमज असतो की, मॉईश्चरायझर लावल्याने त्वचा आणखी तेलकट दिसू लागले, पण हे चुकीचे आहे. तेलकट त्वचेनुसार योग्य मॉईश्चरायझरची निवड करून त्वचेसाठी वापरणे फायदेशीर मानले जाते. ऑईल फ्री मॉईश्चरायझरची निवड करावी त्याने त्वचा तेलकट न वाटता कोमल राहते.
ओटमिलः ओटमिल तेलकट त्वचेसाठी प्रभावी आहे. चेहऱयावर लावल्यास त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतं.
मधः मधाला अॅण्टीसेप्टिक आणि अॅण्टी बॅक्टेरीअल मानले जाते. तेलकट चेहऱयावर मध लावून काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. फरक जाणवेल.
तेलकट त्वचेची अशी घ्या काळजी
- चेहरा वारंवार न धुता दिवसातून दोनदा धुणे योग्य आहे.
- चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करणे.
- आठवडय़ातून दोनदा चेहऱयाला स्क्रब करा. त्याने त्वचेवर अडकलेले धुलीकण बाहेर निघतात. मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.
- टोनर, मॉईश्चरायझरचा वापर करणे फायदेशीर आहे.
- योग्य सनस्क्रिनचा वापर करणे.
चेहरा धुवा
चेहरा वारंवार न धुता किमान दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे असते. यामुळे त्वचेवरील धूळ, घाम निघून जाण्यास मदत मिळते. चेहरा धुण्यासाठी शक्यतो फेसवॉशचा वापर करावा आणि त्याने चेहरा स्वच्छ होऊन तेलकट त्वचेवर नियंत्रण मिळवता येते. तसेच चेहरा धुताना साबणाचा वापर करत असाल तर सौम्य साबण वापरून कोमट पाण्याने चेहरा धुवावा. सुगंधी साबण वापरणे शक्यतो टाळावे.
तेलकट त्वचा असणाऱयांनी काय खावं
तेलकट त्वचा असणाऱयांनी त्वचेबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेणेही उत्तम मानले जाते. त्याचाही चेहऱयावर परिणाम होत असतो.
काकडीः तेलकट त्वचा असणाऱयांनी त्यांच्या आहारात काकडीचा समावेश ठेवावा. काकडी त्वचा अँटीऑक्सिडंटसोबतच हायड्रेट ठेवण्याचे काम करते.
सुकामेवाः या त्वचेच्या लोकांनी आपल्या खाण्यात सुकामेवा ठेवावा. त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऑसिड असतं जे तेलकट त्वचेसाठी उपयुक्त ठरतं.
संत्रः संत्र्यासारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमीन सीसोबतच डिटॉक्सिफाइंग घटकही असतात जे त्वचेवरील अतिरिक्त तेल बाहेर टाकतात.
हिरव्या भाज्याः निरोगी आरोग्यासाठी हिरव्या भाज्या उपयुक्त मानल्या जातात. या भाज्यांमध्ये तेल किंवा चरबीची मात्रा नसतेच. त्या फायबर समृद्ध असतात आणि त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते.
डाळीः डाळींमध्ये भरपूर पोषण असून ते चेहऱयावरील तेलाचं उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात. त्वचेवरील तेलाचं संतुलन कायम राखण्यात डाळी खूप चांगल्या असतात.
मासेः माशांमध्येही ओमेगा-3 फॅटी ऑसिड असतं. चेहऱयावरील सूज कमी करण्यात मदत करतात आणि तेलकट त्वचा सुधारतं. ज्यामुळे पिंपल्स येत नाहीत. आहारात माशांचा समावेशही करणे गरजेचे आहे.
नारळ पाणीः त्वचा हायड्रेड ठेवण्यासाठी नारळ पाणी उपयुक्त आहे. ते त्वचा स्वच्छ आणि कोमल राखण्यास मदत करते.

























































